खासदार सुप्रिया सुळेनीं पंतप्रधान मोदींची घेतली भेट ; भेटीत नेमकी काय चर्चा?

पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. अशातच आता
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवनात खासदार सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीत आपल्या मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न, तथा राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष या निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देखील आहे. तर राष्ट्रवादीचा दुसरा गट हा विरोधात आहे. सत्ताधारी गट आणि विरोधातील गट यांच्यात नेहमी टीका होत असते. सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीत याबाबत चर्चा झाली का? ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत पार पडलं होतं. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र आले होते.त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.