खासदार संजय राऊतांची निकालावर प्रतिक्रिया; बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न……

बिहार : बिहार निवडणुकीत एनडीएने ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भाजप 92 जागांवर आघाडीवर आहे तर जदयू 82 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी 20 जागी आघाडीवर आहे. आता या निकालावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग, भाजप यांच्यावर उपरोधिक टीका करतानाच महाराष्ट्रातील पॅटर्न आणि बिहारचा संबंध लावला आहे. आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे की, बिहारच्या विधानसभा निवडणुक निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना 50 च्या आत संपवले, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल केवळ 27 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. कम्युनिस्ट पक्ष 2 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तेजस्वी यादव राघवपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहे. अनेक बडे नेते पराभवाच्या छायेखाली आहेत. बिहारच्या निकालावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत पोस्ट करत जोरदार टोला लगावला आहे.
