समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे शिरूरमध्ये शोककळा, पती-पत्नीसह मुलीचा मृत्यू
शिरूर : समृद्घी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सिंदखेडराजा येथील पिंपळे गावाजवळ घडली असून, बस नागपूरहून पुण्याकडे येत होती.
या अपघातात शिरूर मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शिरूर शहर व गंगावणे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
कैलास बबन गंगावणे (शिक्षक, वय ४५ वर्ष) कांचन कैलास गंगावणे (वय ३८), ऋतुजा कैलास गंगावणे (वय २१ वर्ष ) सर्व रा. शिरूर, जिल्हा पुणे यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
कैलास गंगावणे शिक्षक होते तर त्यांची पत्नी या गृहणी होत्या तर मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत होती. शिरुर मुंबई बाजार येथे राहणारे हे कुटुंबीय नोकरीसाठी निरगुडसर येथे सध्या राहत होते. या घटनेने गंगावणे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. नागपूर येथे महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळेस त्यांच्यावर काळाने घाला घातला.
गंगावणे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून शिक्षक नोकरी करीत होते तर सई गंगावणे ही अतिशय हुशार विद्यार्थीनी होती. तिला तिच्या गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता व ती वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी होती.
शिरूर येथील रुपेश गंगावणे यांनी या घटनेस दुजोरा दिला असून, मयत कैलास गंगावणे हे त्यांचे चुलत बंधू होते. दुर्दैवी अपघात आणि प्रत्येकाला हळहळ वाटणारी घटना घडल्याने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे