एमआयटी एडीटी विद्यापीठ- फिलिप्स इंडिया यांच्यात सामंजस्य करार….

लोणी काळभोर : नावीन्य, संशोधन आणि भावी काळासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे आणि फिलिप्स इंडिया यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. उद्योग–विद्यापीठ सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने हा करार एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या करारांतर्गत एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट’ हा विषय संरचित पद्धतीने समाविष्ट करण्यात येणार असून फिलिप्सच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग-अनुभव, तज्ज्ञ व्याख्याने, उद्योगभेटी आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील.

या करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी फिलिप्स इंडियाकडून विस्पी काकारीयल, आशिष शाह आणि चेतन लोणकर उपस्थित होते. तर विद्यापीठाकडून कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र.कुलगरु डाॅ.रामचंद्र पुजेरी, डॉ. स्वाती मोरे, डाॅ.रेणू व्यास, डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.सुदर्शन सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना चेतन लोणकर यांनी विद्यापीठाच्या प्रगतिशील दृष्टीकोनाचे आणि प्रभावी समन्वयाचे कौतुक केले. तसेच उद्योग–विद्यापीठ सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एमआयटी एडीटी व्यवस्थापनाने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या करारामुळे विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनकारी शैक्षणिक संधी निर्माण होतील, संयुक्त संशोधनाला चालना मिळेल आणि आरोग्य तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भावी विकासात मोलाचे योगदान देता येईल, असे प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी यावेळी सांगितले.
