आईचे शब्द लागले जिव्हारी ; नर्सिंगच्या विद्यार्थिनीने घरात आयुष्याचा केला शेवट..

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ वर्षीय तरुणीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आईने टीव्ही बंद करून अभ्यास करण्यास सांगितल्याच्या कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,विशाखा अनिल वक्ते असं आत्महत्या करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं नाव आहे.ती नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती आणि तिचे वडील एका कंपनीत काम करतात. रविवारी संध्याकाळच्या वेळी विशाखा तिच्या राहत्या घरात टीव्ही पाहत होती. त्याचवेळी, आईने विशाखाला टीव्ही बंद करून अभ्यास करण्यास सांगितले. आईच्या या बोलण्याचा विशाखाला राग आला. आई स्वयंपाक घरात गेल्यानंतर आणि तिचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असताना, विशाखाने हे टोकाचे पाऊल उचलले.याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

विशाखाने आत्महत्या केल्याचा हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दवाखान्यात धाव घेतली. विशाखाला बेशुद्धावस्थेत पाहून त्यांनी तातडीने तिला शहरातील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

