Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबाराने जगभरात खळबळ, ७० ठार, १५० जखमी, नेमकं घडलं काय?
Moscow Shooting : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती असून या हल्ल्यात ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी, २२ मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला.
मॉस्कोमध्ये झालेल्या या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयएसआयएस या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन वहे पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर हा मोठा हल्ला घडला आहे.
मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक आले होते. त्यावेळी अचानक सहा ते सात हल्लेखोर शिरले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. Moscow Shooting
बंदिस्त ठिकाण असल्यामुळे अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. १५ ते २० मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यामध्ये ४० टक्के भाग जळून खाक झाला.
महत्त्वाचं म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसंच असा हल्ला होऊ शकतो याची कल्पना आम्ही रशियाला 7 मार्च रोजीच दिली होती असं अमेरिकेनं म्हटलंय. हल्ल्यामागे युक्रेनचा हात नाही असा दावा देखील अमेरिकेने केला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सुरू झाल्यानंतर स्फोट झाला. टास वृत्तसंस्थेनुसार, आपत्कालीन सेवांनी सांगितले की, लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
घटनास्थळी ५० रुग्णवाहिका रवाना…
मॉस्को क्षेत्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्यानंतर ५० रुग्णवाहिका टीम क्रोकस सिटी हॉलमध्ये पाठवण्यात आल्या.मॉस्को कॉन्सर्ट हॉलच्या तळघरातून १०० लोकांना वाचवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला.