महाराष्ट्रातील पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांच्या संमतीनेच ! सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीकडूनच ऑफर ! !
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय कोंडी झालेली असताना, देवेन्द्र फडणवीस व अजित पवार यांनी भल्या पहाटे सरकार स्थापन करून महाराष्ट्राला धक्का दिला होता. ते अजित पवार यांनी केलेले बंड होते व पुरेसे संख्याबळ न झाल्याने फसले असे आजवर मानले जात होते. पण आज स्वत: देवेन्द्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या संमतीनेच सरकार स्थापले होते असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.
उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबतची चर्चा करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीकडूनच आम्हाला ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे. आपण सरकार तयार करुया. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या होत्या. पण नंतर सगळं बदलले. उद्धव ठाकरेंप्रमाणेच राष्ट्रवादीकडूनही विश्वासघात झाला असा खळबळजनक गौप्यस्फोट देवेन्द्र फडणवीस यांनी आज केला.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही शरद पवार यांचीच खेळी होती असे सांगून खळबळ उडवून दिली होती. परंतु नंतर त्यांनी या वक्तव्यापासून घुमजावं केले होते. ही घटना ताजी असतानाच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी त्यांचा व अजित पवार यांचा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनेच झाला होता असे सांगून गोंधळ उडवून दिला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी हा गौप्यस्फोट केला.