नवी दिल्लीत 50 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणे रद्द, नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शुक्रवारी जोरदार धुळीचे वादळ निर्माण झाले होते.
याचा फटका दिल्लीकरांना देखील बसल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही उड्डाणे रद्द देखील करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे अनेक विमाने आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने विमानतळावर पोहोचली. यामुळे इतर सर्व यंत्रणेवर देखील याचा परिणाम दिसून आला.
याबाबत खराब वातावरणामुळे प्रवाशांना जो त्रास होत आहे, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो असेही एअर इंडियाने सांगितले आहे. एअर इंडियाकडून शनिवारी आपल्या प्रवाशांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.
यामध्ये काही माहिती देण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा एकदा सायंकाळी ५:३० ते रात्री ९ च्या दरम्यान शहरात वादळ निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम विमान वाहतुकीवर पडू शकतो असे एअर इंडियाकडून आपल्या प्रवाशांना सांगण्यात आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील सेवेवर परिणाम होऊ शकतो.
एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना विनंती केली आहे की, काही विमानांना त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा जास्त विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या फ्लाईटच्या वेळेसंदर्भात अपडेट राहा. एअर इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन ठराविक अंतराने आपल्या विमानाच्या वेळेच्या स्थितीबाबत जाणून घ्या, असेही सांगण्यात आले आहे.