मतदानाआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा, तुमच्या खात्यात किती रक्कम आली?, लगेच तपासा…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

राज्यातील लाडक्या बहिणींना यंदाच्या महिन्यात संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर १५०० रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नियमित योजनेचा लाभ देण्यास परवानगी दिल्यानंतर आजपासून राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली असून सकाळपासूनच मोबाईलवर मेसेज आले आहेत.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केला आहे. त्यानंतर, डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता बँक खात्यात जमा झाला आहे.

लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट देण्यासाठी १४ जानेवारी पूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार, अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहिण योजनेसंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, असे राज्य निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना कळविले होते.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशातील तरतुदींनुसार निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेली विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे, असे मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात कळविले होते.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या योजनेचा नियमित लाभ देता येईल; परंतु अग्रिम स्वरुपात लाभ देता येणार नाही; तसेच नवीन लाभार्थीदेखील निवडता यणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्यामुळे, लाडक्या बहिणींना ३००० ऐवजी १५०० रुपये देण्यास परवानगी मिळताच, मतदानाच्या दोन दिवस अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आजपासून १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.