डॉक्टर महिलेचा दवाखान्यात विनयभंग, मांजरीत धक्कादायक प्रकार
उरुळी कांचन : हडपसर भागात एका डाॅक्टर महिलेचा विनयभंग करून पतीला जिवे मारण्याची धमकी दिली गेली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
मांजरी भागातील अतुल वसंत घुले असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत एका डाॅक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये पुणे आणि परिसरात असे अनेक गैरप्रकार घडल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवरील वाचक कमी झाल्याचे दिसून येत आहे.
तक्रारदार महिलेचा मांजरी भागात दवाखाना आहे. आरोपी घुले याची दवाखान्याशेजारी खाणावळ आहे. खाणावळीत व दवाखान्यात कोणी नसताना घुले हा सारखा दवाखान्यात डोकावत होता. दरम्यान, आरोपी घुले उपचाराचा बहाणा करून दवाखान्यात येत असे.
त्याच वेळी घुले याने डाॅक्टर महिलेशी लज्जास्पद वर्तन केले. घुले याने डाॅक्टर महिलेचा पाठलाग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या डाॅक्टर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.