खेड बाजार समितीत मोहिते पाटलांची बाजी, राष्ट्रवादीकडे 10 जागा
पुणे : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ९९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता राष्ट्रवादी काँगेस पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 10, ठाकरे गटाला 3, भाजपला 2, काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालं आहे.
तसेच व्यापारी मतदारसंघातील 2 अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँगेस विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत झाली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती.
पण त्यांचा या निवडणुकीत विजय झाला. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील ७ ठिकाणी १७ मतदान केंद्रावर उत्साहात मतदान झाले. बाजार समितीची निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. तब्बल ९८.५४ टक्के मतदान झाले.
दरम्यान, तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण, वाडा, शेलपिंपळगाव, कनेरसर, पाईट आणि आंबोली अशी सात मतदार केंद्रे होती. राजगुरुनगर येथे कृषी पतसंस्था व ग्रामपंचायत मतदारसंघांबरोबरच आडते व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघातीलही मतदान होते.