महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शारदीय उत्सवापूर्वीची देवीची मोह निद्रा मंगळवार पासून …..
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मोह निद्रेस मंगळवारपासून (दि. 24) भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमीला सायंकाळी सुरुवात होत आहे. मातेच्या सायंकाळच्या नित्य पूजेनंतर मुख्य मूर्ती सिंह गाभाऱ्यातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त केली जाणार आहे.
नऊ निद्रा पूर्ण करून दहाव्या दिवशी म्हणजे गुरुवारी पहाटे (दि. 3 ऑक्टोंबर) आश्विन शुध्द प्रतिपदेला मातेची मुख्य मुर्ती सिंहासनारूढ होत आहे. याचदिवशी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होणार आहे. येत्या 3 ते 18 ऑक्टोंबरपर्यंत चालणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या धर्तीवर राज्यासह परराज्यातून मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची खासगी वाहने तुळजापूर शहराबाहेर पाच किलोमीटर अंतरावर रोखण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
सर्वदूर चेक पोस्टही केले जाणार आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसराची स्वच्छता व साफसफाई करून संपूर्ण परिसराचे निर्जतुकीकरण करून घेण्याची गरज भाविकांतून व्यक्त होत आहे. मातेच्या मंचकी निद्रेच्या धर्तीवर सेवेकरी पलंगे परिवाराकडून बुधवारी दिवसभर मातेच्या शेजघराची साफसफाई व पलंगाची डागडुजी करून घेण्यात येते. यावेळी मातेच्या गादी-उशांसाठी लागणारा कापूस निंदण्यासाठी आराधिनी महिला व विणेकऱ्यांचीही लगबग सुरू असते.