मोदी सरकारची पुणेकरांना मोठी भेट, पुण्याला मिळणार ‘इतक्या’ ई-बस; जाणून घ्या संपूर्ण माहिती…


पुणे : पुणे-पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ‘ई-बस’ खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

लवकरच या बस पुणे महानगर परिवहन महामंडळ च्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, प्रदूषण नियंत्रणातही मोठी मदत मिळणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सातत्याने पाठपुरावा करून अखेर केंद्र सरकारकडून या बस खरेदीस मान्यता मिळवली आहे. सध्या पीएमपीएमएलकडे सुमारे २००० बस आहेत, त्यापैकी ७५० स्वमालकीच्या आणि उर्वरित ठेकेदारांच्या आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या ताफ्यात किमान ३००० बस असाव्यात, अशी मागणी होती.

       

मोहोळ यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री कुमारस्वामी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वारंवार भेट घेऊन प्रस्ताव पुढे नेला. फडणवीस यांनी राज्य सरकारकडून रिझर्व्ह बँकेला आवश्यक पत्र पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली, त्यानंतर पीएमपीएमएलमार्फत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. शेवटी या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला.

मोहोळ यांनी सांगितले की, “या निर्णयामुळे पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. या ई-बस केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नव्हे, तर प्रदूषण नियंत्रणासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतील.

पुण्यातील वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण आणि डिझेल खर्च लक्षात घेता, ई-बस प्रणाली हे एक आधुनिक आणि पर्यावरणपूरक पाऊल ठरणार आहे. ही वाहतूक योजना केंद्राच्या हरित ऊर्जा धोरणाशी सुसंगत असून, नागरिकांना स्वच्छ व शांत प्रवासाचा अनुभव देणार आहे.

मोहोळ पुढे म्हणाले, पुण्यात सध्या ३२ किलोमीटरवर मेट्रो सुरू आहे, तसेच शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गही लवकरच कार्यान्वित होणार आहे. मेट्रोसोबतच ई-बस सेवा सुरू झाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सशक्त होईल. या उपक्रमामुळे पुणे-पिंपरी चिंचवड शहराचा शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शहरांच्या सुनियोजित आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मंजूर झालेल्या या १००० ई-बस हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे, असे मोहोळ म्हणाले. तसेच त्यांनी “या निर्णयासाठी सहकार्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!