मनसे प्रमुख राज ठाकरे ॲक्शन मोडवर ; निवडणुकीआधी भव्य मेळावा, जोरदार बॅनरबाजी

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदारयादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा पार पडत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ग्रँड मेळाव्यासाठी मनसेकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याला मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

मनसेकडून आयोजित मतदार यादी प्रमुखांच्या भव्य मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे आणि मतदानाची प्रक्रिया बारकाईने हाताळण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. मनसे या मेळाव्यातून आपल्या आगामी राजकीय वाटचालीची आणि निवडणुकीच्या तयारीची दिशा स्पष्ट करणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या मेळाव्यातून राज ठाकरे मतदार यादीतील त्रुटी आणि मतदान प्रक्रियेतील अनियमितता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची शक्यता आहे. तसेच दुबार नावे, यादीतील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींबाबत मनसैनिकांनी कसे सतर्क राहावे याबद्दलही राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे येथून नेस्को ग्राऊंडपर्यंत मनसेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

