मोठी बातमी! शिंदे गटातील १२ आमदार पुन्हा ठाकरेंकडे जाणार.? मातोश्रीवर फोनही गेला, पण…
मुंबई : शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात असलेली राजकीय केमेस्ट्री बिघडण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच शिंदे गटातील काही नाराज आमदारांकडून उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजे २७ जुलैला शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. या आमदारांना उद्धव ठाकरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या.
त्यासाठी संबंधित आमदारांकडून मातोश्रीवर फोनही करण्यात आला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या संबंधित आमदारांना भेट नाकारल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचे कारण पुढे करत या आमदारांना भेटणे टाळले, असे ठाकरे गटाच्या गोटातून सांगितले जात आहे.
तसेच, दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट उद्धव ठाकरे यांच्या गटातील १० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यापैकी सहा आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. मी आत्ता लगेच त्यांची नावं सांगू शकतो. परंतु, राजकारणात नैतिकता पाळायची असते, असे उदय सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, हे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना त्यांना कधी उद्धव ठाकरे यांना भेटता आले नाही, त्यांच्याशी बोलता आले नाही. त्यामुळे ४० आमदारांनी बंड केले.
या आमदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. अजित पवारही आता या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. ही एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता आणि विकासाभिमुख राजकारणाला मिळालेली पोचपावती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले.