आमदार रोहित पवार यांची मतदारांना भावनिक साद! अजितदादांच्या घड्याळाला मतदान करण्याचे केले आवाहन…

पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, नऊ दिवस उलटूनही अजितदादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

अशातच आता राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार आज थंडावत आहे त्या पार्श्वभूमीवर आज आमदार रोहित पवार यांनी या बारा जिल्हा परिषद मतदार संघातील मतदारांना आवाहन केले आहे की अजित पवारांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करा म्हणजेच हीच ती वेळ असल्याचे सांगत अप्रत्यक्ष घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी केलेली समाज माध्यमावरील पोस्ट अशी आहे की, राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठीच विमानाने जात असताना काळाने घाला घातला आणि मा. अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं. या दुःखद घटनेमुळं नियोजन करुनही पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे.

त्यामुळं निवडणूक असलेल्या बाराही जिल्ह्यातील मतदारांना विनंती आहे की, मा. अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ आणि मा. अजितदादांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे! अशा प्रकारची पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.