मारहाण प्रकरणी आमदार अनिल परब अडचणीत, गुन्हा दाखल..
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यासह पाच जणांविरुद्ध मुंबई महापालिकेच्या कर्मचा-यांना मारहाण करणे, धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्ह्याचे कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
याप्रकरणी रात्री उशिरा सदा परब, हाजी अलिम, उदय दळवी आणि संतोष कदम या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
उद्धव ठाकरे गटातर्फ़े मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान काही कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनेची शाखा पडल्याप्रकरणी बाचाबाची झाली होती.
महापालिकेच्या कर्मचाऱ्याने आमदार अनिल परब यांच्यासह उद्धवसेनेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून कारवाई करण्यात येत आहे.
पोलिसांनी कलम ३५३, ३३२, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. यामध्ये माजी नगरसेवक हाजी अलीम शेख, विधानसभा संघटक माजी नगरसेवक सदा परब, उदय दळवी, संतोष कदम या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच उर्वरित फ़रार आरोपींचा शोध सुरू आहे. अनिल परब उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. यामुळे त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.