धक्कादायक!! मंत्र्याच्या मुलाकडून विवाहितेचा छळ, सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोपांनी राज्यात खळबळ….

मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मराठवाड्यातील ताकदवान नेते संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत.
सिद्धांत शिरसाट यांनी आपल्याला धमकावून आणि बळजबरीने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सिद्धांत शिरसाट यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला, असा आरोप या महिलेने केला आहे.
जान्हवी सिद्धांत शिरसाट असं या महिलेने आपलं नाव लावलं आहे. वकिलामार्फत असा दावा करण्यात आला आहे की, सिद्धांतने जान्हवीशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर त्यांनी जान्हवीला नांदवायला नकार दिला. जान्हवीने छत्रपती संभाजीनगरला येण्याचा आग्रह केला, पण तिला येऊ दिले नाही.
तिला मुंबईतच राहण्यास सांगितले गेले, आणि तिथे महिलेवर अन्याय-अत्याचार करण्यात आला, असा आरोप वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी केला आहे. संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत महत्त्वाच्या जबाबदारीवर असलेले मंत्री आहेत, ज्यामुळे हे प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनले आहे.
या प्रकरणात वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी पुढे असेही सांगितले की, चेंबूर येथे वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे. तिथे दोन वर्षांपूर्वी जान्हवीसोबत सिद्धांतने लग्न केले. फॅमिलीसोबत रितीरिवाजानुसार लग्न झाले. दोन वर्षे चांगले गेले. पण नंतर सिद्धांतचे तिसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. त्याने जान्हवीकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आणि मानसिक छळ सुरू केला. तो तिला इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचा.
सिद्धांतने जान्हवीला संभाजीनगरला कधीच येऊ दिले नाही, उलट “संभाजीनगरला आलीस, तर तंगडं तोडू, अशी धमकी दिली, असाही आरोप करण्यात आला आहे. सात दिवसांच्या आत जान्हवीला नांदवण्यासाठी आम्ही सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस दिली आहे. अन्यथा महिला अत्याचार कायद्यासह तीन केसेस दाखल करू,” असा इशारा जान्हवीचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिला आहे.