महायुतीच्या वादात मंत्री माणिकराव कोकाटेंची उडी ; भाजप हा पूर्ण बाटलेला पक्ष, वाद पेटणार?


पुणे : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.मात्र या निवडणुकांच्या आधीपासूनच,भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपविरुद्ध राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी विरोधात शिंदे सेना अशी चकमक उडालेली आहे. मित्रच शत्रू झाले आहेत. आता या महायुतीच्या वादात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उडी घेत भाजपवर जहरी टीका केली आहे. भाजप हा पूर्णपणे बाटलेला पक्ष असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, राज्यात नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये महायुतीच्या मित्र पक्षांमध्येच आपसात लढाया आहेत. विरोधी पक्ष केवळ नावालाच आहेत. आज आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असलो, तोंडसुख घेत असलो तरी 2 तारखेनंतर पुन्हा एकत्र मांडीला मांडी लावून बसणार आहोत. महायुतीचे सरकार म्हणून आम्ही आणलेल्या योजना या जनतेच्या फायद्यासाठीच्या आहेत. त्यांचे श्रेय कोणा एका पक्षाचे नाही.युतीमधे जास्त लढाया आहेत, जास्त संघर्ष युतीतच आहे. आपल्याकडे थोडासा उबाठा आहे.. बीजेपी पूर्ण बाटलेली आहे इकडून फोड तिकडून फोड अशी परिस्थिती आहे. बीजेपीचे आयुष्य फोडाफोडी मध्ये चाललं आहे, अशी सडकून टीका माणिकराव कोकाटे यांनी केली आहे.

मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधताना त्यांनी भाजप पूर्णपणे बाटलेली असून केवळ फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा टोला लगावला. अगोदर माझ्या घरामध्ये भावाला ओढून फोडाफोडी केली आणि आता हेमंत वाजे यांच्या रूपाने खासदार वाजे यांचे घर फोडले. फोडाफोडीचा भाजपला काडीचाही फायदा होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यांचा देखील त्यांनी समाचार घेतला.प्रत्येक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा ते उल्लेख करतात. ही योजना महायुतीची आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या संकल्पनेला पाठिंबा दिला होता हे विसरून चालणार नाही याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!