म्हाडात गैरव्यवहार ? पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल…!

पुणे : म्हाडा व लाभार्थ्यांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. याबाबत म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकूर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दरम्यान, बिल्डरला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नियमानुसार चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळातील मंजूर अभिन्यासात एकूण क्षेत्रफळाच्या 20 टक्के क्षेत्रफळावर विकासकाने अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाअंतर्गत सदनिका म्हाडाला उपलब्ध करून देणे बंधनकारक होते.
मे 2009 मध्ये म्हाडाने काढलेल्या लॉटरीत भूमी कन्स्ट्रक्शनतर्फे पंकज येवला यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील भूमी ब्लेसिंग या प्रकल्पाचा समावेश होता. म्हाडाने लॉटरी काढून जून 2019 मध्ये लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली. लाभार्थ्यांना देकार पत्र देण्यात आले होते.
दरम्यान, म्हाडाने संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सत्र न्यायालय, पुणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. संपूर्ण कार्यवाही ही पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.