पुण्यात म्हाडाकडून हजारो घरांची बंपर लॉटरी जाहीर, घर घेण्याची मोठी सुवर्णसंधी…

पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईनंतर पुण्यातही म्हाडा मोठ्या प्रमाणात घरांची उभारणी करणार आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या उपनगरांचा समावेश आहे. असे असताना महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ (म्हाडा) पुण्यात तब्बल १३ हजार ३०१ घरांसाठी बंपर लॉटरी घेऊन येत आहे.

वाढत्या घरांच्या किंमती आणि भाड्याच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत स्वतःचे घर मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे विभागीय सभापती शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे सामान्य नागरिकांना प्राईम लोकेशनवर घर घेण्याची संधी मिळणार आहे.

स्थानिक ग्रामपंचायतीकडून थोडा विरोध नोंदवला असला तरी जिल्हा प्रशासनाने सर्व नियम आणि प्रक्रियेचे पालन करत प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रोहकल (खेड तालुका) येथे तब्बल ८ हजार घरे उभारली जाणार आहेत. यासाठी ५७ एकर सरकारी गायरान जमीन सुपूर्द करण्यात आली आहे. तसेच नेरे (मुळशी तालुका) येथे ५ हजार ३०१ घरे बांधली जाणार आहे. गट क्रमांक ११७ आणि ११८ मधील साडेसात हेक्टर जमीन यासाठी मिळाली आहे.

दरम्यान, या प्रकल्पांचे उद्दिष्ट ३ ते ४ वर्षांत पूर्ण करण्याचे असून, जमीन सुपूर्द झाल्यानंतर तीन वर्षांत वापरात न आल्यास ती परत घेण्याची अट ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण ३५ हजार घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी म्हाडा १३,३०१ घरांचे बांधकाम करणार आहे.
यामध्ये काही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि गरीब कुटुंबांसाठी राखीव ठेवली जाणार आहेत. त्यामुळे खरोखर गरजू कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल. मुंबईनंतर पुण्यातही म्हाडा मोठ्या प्रमाणात घरांची उभारणी करणार आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्याच्या उपनगरांचा समावेश आहे. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.
