मॅट्रिमोनिअल साईटवर ओळख, लग्नाचंही ठरलं, पण नंतर विपरीतच घडलं!! पुण्यातील आयटीमधील तरूणीसोबत धक्कादायक प्रकार…

पुणे : आजकाल डेटिंग किंवा मॅट्रिमोनी वेबसाइटवरून अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह जुळवणाऱ्या नामांकित संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या संगणक अभियंता तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून ३५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
तसेच या तरुणाला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. साईश विनोद जाधव (वय २५, रा. साईबाबानगर, शेल कॉलनी रस्ता, चेंबूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात २९ वर्षीय तरुणीने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. एप्रिल २०२३पासून गुन्हा दाखल होईपर्यंत आरोपी तरुणीची फसवणूक करीत होता.
तक्रारदार तरुणी बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातील एका आयटी कंपनीत नोकरी करते. तर बाणेर भागात होस्टेलमध्ये राहते. तिने विवाह जुळवणाऱ्या नामांकित संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यावर आरोपीने तरुणीशी संपर्क साधून लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी बाणेर परिसरातही आला. एका रेस्टराँटमध्ये दोघांनी जेवण करून पसंती कळवली.
तरुणीने त्याच्या कुटुंबाची माहिती विचारली असता, आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, भाऊ दुबईत नोकरी करतो, अशी बतावणी त्याने केली. तक्रारदार तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर दोघांच्या गाठीभेटी आणि संवाद वाढला.
त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्याकडून पैसे लाटायला सुरुवात केली. एका मित्राने माझी आर्थिक फसवणूक केली असून, पैसे न भरल्यास मला कारागृहात जावे लागेल, शी बतावणी करून त्याने तरुणीकडे पैसे मागितले; तसेच मोबाईल बिघडल्याचे सांगून तिच्याकडून महागडा मोबाइलही घेतला.
दरम्यान, आरोपीला पैसे देण्यासाठी तरुणीने कंपनीकडून; तसेच खासगी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्ज काढले. दीड ते पावणेदोन वर्षांत आरोपीने तरुणीकडून ३५ लाख २५ हजार रुपये उकळले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. सहायक निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.