मराठी माणसा, चुकशील तर संपशील! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

पुणे :फक्त महाराष्ट्राचेच नाही तर अख्या देशाचे डोळे लागून राहिलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीची काल घोषणा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी’ मराठी माणसा, चुकशील तर संपशील ‘ अशी साद घातली.ठाकरेंच्या याचं विधानानं मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा अजेंडा ठरल्याचं स्पष्ट होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. तर राज ठाकरेंनीही मुंबईचा महापौर मराठी होणार असल्याचं सांगून मराठीच्या मुद्द्याला पुन्हा हायलाईट केल आहे.तब्बल पाच महिन्यापूर्वी हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. सरकारच्या हिंदीसक्तीच्या मुद्द्याला विरोध करून मराठीचा मुद्दा ठाकरेंनी ऐरणीवर आणला.आणि त्यानंतर सुरु झाली ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा.आता महापालिकेआधी युतीची घोषणा करून ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानं विरोधकही आक्रमक झालेत. ठाकरेंनी मराठीसाठी काय केलं? असा खोचक प्रश्न विरोधकांनी केला आहे.

शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसासाठी झाली. भाजप- शिवसेना युतीच्या काळात मराठीऐवजी हिंदुत्वाचाच मुद्दा प्रखरतेनं मांडण्यात शिवसेना वरचढ ठरली. त्यात राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी हिंदुत्वाची शाल पांघरूण मराठीचा मुद्द्याला साईडलाईन केलं होतं. मात्र आता मुंबईच्या सत्तेसाठी मराठी माणसाच्या अस्तित्वाचा नारा देऊन जरी ठाकरे बंधू एकत्र आले असले.तरी मुंबई महापालिकेची निवडणुक ठाकरेंसाठीच अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

आता या अस्तित्वाच्या लढाईत मराठी माणुस ठाकरेंच्या पाठिशी उभा राहतो का? भाजप मराठीच्या मुद्द्याला वळण्यासाठी कोणत्या अस्त्राचा वापर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
