Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आजही अनेक ठिकाणी चक्काजाम, मराठा समाज आक्रमक, राज्यभरात परिस्थिती काय?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सातवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.
मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे.
पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर चक्काजाम..
सातारा पुणे या मार्गावरून येणाऱ्या मार्गावर वाखरी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरु केल्याने सातारा व पुणे मार्गावरून येणारी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. गोपाळपूर चौकात केलेल्या चक्क जाममुळे मंगळवेढा आणि कर्नाटकमधून येणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
याशिवाय कासेगाव येथे सुरु असलेल्या चक्का जाममुळे कोल्हापूर आणि कोकणातून येणारी वाहतूक थांबली आहे. या रास्ता रोकोमुळे पंढरपूरातून देखील वाहने बाहेर पडू शकत नसल्याने सर्वच मार्गांवर शेकडो एसटी बसेस अडकून पडल्या आहेत. सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असून सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन केले जात आहे.
परभणीत मराठा समाजाचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन…
परभणीत दुसऱ्या दिवशीही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. परभणीच्या सेलू-परतूर महामार्गावरील हदगाव खुर्द येथे रस्त्यावर टायर जाळून आणि जागोजागी काटेरी झुडपे, दगडे आडवे लावून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
या मार्गावरची वाहतूक मराठा समाज बांधवांनी बंद केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
बीड जिल्ह्यात वाहतूक खोळंबली..
बीड जिल्ह्यातील परळीत बीड व गंगाखेड रस्त्याला जोडणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक-इटके कॉर्नर येथे सकाळी 10 पासून मराठा समाजाने रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केले. या चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यात गाड्या लावून आंदोलकांनी वाहतूक थांबवत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात ५०० हून अधिक बस फेऱ्या रद्द..
हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव पाटीवर कालपासून रास्तारोको आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. प्रशासनाच्या वतीने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत आणि हिंगोली या तीनही आगारातील बस सेवा बंद आहे. त्यामुळे 500 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.