मराठा मोर्चा आज मुंबईत धडकणार, सरकारच टेन्शन वाढलं…


मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रखर झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचा मोर्चा आज रात्री मुंबईत धडकणार असून, आझाद मैदानावर हा आंदोलनाचा निर्णायक टप्पा गाठणार आहे.

गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सरकारसाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे. काल रात्री जुन्नर येथे मोर्चाचा मुक्काम झाला. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जरांगे पाटील आज मुंबईकडे कूच करत आहेत.

वाटेत अहिल्यानगर येथे मराठा समाज बांधवांशी संवाद साधण्याचे नियोजन आहे. या प्रवासात हजारो आंदोलक सहभागी झाले असून, प्रत्येक ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत होत आहे.मुंबईतील आझाद मैदानात मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

घोषणाबाजी आणि उत्साहाने मैदान दणाणून गेले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात ओबीसी आणि मुस्लिम बांधवांचाही सहभाग आहे, ज्यामुळे एकात्मतेचा संदेश जात आहे. मोठ्या संख्येने जमलेली ही गर्दी सरकारवर दबाव आणणारी ठरत आहे.

मुंबई पोलिसांनी आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी दिली असली तरी त्यावर २० अटी लादण्यात आल्या आहेत. यात आझाद मैदानात स्वयंपाक करण्यास मनाई, कचरा करण्यास बंदी आणि कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास आंदोलन बेकायदेशीर ठरवण्याचा इशारा दिला आहे.

आझाद मैदानात फक्त ५,००० आंदोलकांना परवानगी आहे. तरीही बाहेरून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे येत असल्याने परिस्थिती ताणली जाण्याची शक्यता आहे.जरी पोलिसांनी फक्त एका दिवसाची परवानगी दिली असली तरी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ते उपोषणाला सुरुवात करतील. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!