नराधम बाप.. घरात कुणी नसताना साधायचा डाव, पोटच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य, घटनेने राज्य हादरले

मुंबई : रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मुंबईच्या कांदिवली परिसरातून समोर आली आहे. इथं एका विकृताने आपल्या १३ वर्षीय लेकीवर वारंवार अत्याचार केला आहे.

आरोपी मागील सहा महिन्यांपासून तिचं लैंगिक शोषण करत होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी ४० वर्षीय नराधम पित्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ पासून ते २ मार्च २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत हा अघोरी प्रकार सुरू होता. घरात कोणीही नसताना आरोपी पिता आपल्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून अश्लील चाळे करायचा. नराधम बापाने नात्याची सर्व मर्यादा ओलांडून मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

पित्याकडून होणाऱ्या या मानसिक आणि शारीरिक शोषणाने मुलगी पूर्णपणे खचली होती. वडिलांच्या सततच्या त्रासाला आणि अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने मंगळवारी धाडस दाखवलं. तिने थेट समतानगर पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेला हा भयाण प्रसंग पोलिसांना सांगितला.
आपल्याच पित्याविरुद्ध तिने तक्रार नोंदवली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी ४० वर्षीय आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच समतानगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.