Manoj Jarange Patil : आता मी एकटा पडलोय, तुम्ही…!! मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन थेट आवाहन, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्यासाठी उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन मात्र सुरूच आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या डेडलाईनच्या आधी मोठी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. आठ दिवस ही रॅली चालणार आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ही रॅली काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या रॅलीत महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. ६ जुलै ते १३ जुलै पर्यंत शांतता जनजागरण रॅली आयोजित करण्यात आली आहे.
त्या रॅलीला या. शांततेत या. ६ जुलैपर्यंत सर्व कामे आटोपून घ्या. त्या दिवशी एकानेही घरात थांबू नका. लग्न कार्यालाही जाऊ नका. ताकदीने रस्त्यावर या. आपल्याला घेरलंय. मी एकटा पडलोय. मी हटणार नाही. मेलो तरी मी मागे हटणार नाही.
आपल्या रॅलीला आया बहिणींसह सर्वांनी एकत्र या. शांतता राहिली अत्यंत मोठी झाली पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजांना सांगतो आणि नेत्यांनाही सांगतो. सर्व पक्षातील ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण देऊ नये म्हणून एकवटले आहेत. ते मतांचा विचार करत नाही, ते आरक्षणाचा विचार करत आहेत. Manoj Jarange Patil
मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. आरक्षणाचा विचार करत नाहीत. ओबीसी नेत्यांना मतांची गरज नाही. त्यांना आरक्षण हवं आहे. यावरून आरक्षण किती मोठा मुद्दा आहे हे लक्षात घ्या. सर्वच पक्षातील ओबीसी नेते एकत्र आले आहेत. विरोधी पक्षातील ओबीसी नेतेही एकत्र आले आहेत.
कोणीही पक्षाला जुमानत नाहीत. सर्व ओबीसी नेते एकवटले आहेत. म्हणजे मराठा नेत्यांना समजत नाही का? ते मताला आणि पदाला किंमत देत नाही. तुम्ही का करत नाही? तुम्हाला कळत नाही का?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.