Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मुंबईला उपोषणासाठी जात असताना वाघोलीत पहाटे विनापरवाना स्पीकर लावून सभा घेतली. याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह वाघोली येथील मराठा समन्वयकांवर दीड महिन्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक रितेश काळे यांनी फिर्याद दिली असून जरांगे पाटील यांच्यासह गणेश म्हस्के, संदीप कांबीलकर, शेखर पाटील व इतर आठ ते दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई असा प्रवास केला होता. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभाही घेतल्या होत्या. या यात्रेदरम्यान २३ जानेवारी रोजी वाघोली येथे त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभाही पार पडली होती. Manoj Jarange Patil
याठिकाणी मनोज जरांगेयांची पहाटे तासभर सभा झाली होती. यादरम्यान, आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील लोणीकंद पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह ८- १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.