मणिपूर पुन्हा पेटले! जाळपोळीत जवानासह ६ जण ठार, जमावाचा पोलिस ठाण्यावर हल्ला..
मणिपूर : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. सध्या इथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे.
युम्नाम पिशाक मेईतेई (वय ६७) आणि त्यांचा मुलगा युम्नाम प्रेमकुमार मेईतेई अशी मृतांची नावं आहेत. याशिवाय त्यांचा शेजारी युम्नाम जितेन मेईतेई याचीही हत्या करण्यात आली होती.
मृतांचा आकडा १६०आहे, परंतु सततच्या हिंसाचाराकडं पाहता या उपद्रवात किती लोक मारले गेले याची मोजदाद झाली नाहीये. काल (शनिवार) IRF जवानासह किमान ६ जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत अनेक भागात गोळीबार सुरू होता. क्वाटा परिसरात मेईतेई समाजातील तीन लोकांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहांचीही नासधूस केली.
काही तासांनंतर चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी समाजातील दोन लोकांची हत्या करण्यात आली. या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांचा काही संबंध आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा एक जवानही शहीद झाला आहे. जमावानं २३५ असॉल्ट रायफल, २१ सब-मशीन गन, १६ पिस्तूल, ९,००० गोळ्या आणि १२४ हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला.
दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कुकी गट , इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम ने हिंसाचारात बळी पडलेल्या ३५ जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला.