रमीमुळे कृषीमंत्रिपद जाताच माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘मी खूप आनंदी..

मुंबई : विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे.

माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे.
तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत.
खाते बदलल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मी आनंदी आहे. निर्णय मान्य आहे. भरणे साहेबांना काही मदत लागली तर नक्की करेन, असं सांगत कोकाटेंनी गोड बोलण्याचा प्रयत्न केला.

नवीन खात्याबाबत विचारलं असता, “I AM VERY HAPPY” असं इंग्रजीतून उत्तर देत कोकाटे यांनी गोंधळ उडवला. यावरून सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे ते गमावलेल्या खात्याबाबत काहीही खंत न दाखवता पुढे जाण्याच्या तयारीत दिसत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली आहे.
या खातेपालटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. एकीकडे रमी वादामुळे कोकाटेंना झटका देण्यात आला, तर दुसरीकडे विश्वासू नेते दत्तात्रय भरणे यांना कृषीखाते दिले गेले. भरणे यांची खातेवाटपावरून नाराजी व्यक्त झाली होती, त्यामुळे ही वर्णी त्यांच्यासाठी लॉटरी ठरली.
दरम्यान, राजकीय विश्लेषकांच्या मते, यामुळे अजित पवारांनी एकाच वेळी दोन पक्षी मारले आहेत – कोकाटेंवर कारवाईचं भान राखलं आणि भरणेंना महत्त्वाचं खातं देऊन त्यांना विश्वासात घेतलं आहे.