माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्री पदावरून अखेर उचलबांगडी ;’ हे’ असणार नवे कृषिमंत्री..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आला असुन त्यांच्यावर आता क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कृषीमंत्र्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे.

विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून क्रीडा आणि युवक खातं मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी एक लॉटरी ठरली आहे. कृषिखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासाठी त्यांची वर्णी लागली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील मंत्र्यांना यापुढे कोणताही बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, थेट कारवाई केली जाईल असं स्पष्ट सांगितला आहे. कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय हा सर्वांसाठीच महत्त्वाचा संकेत आहे.आपण या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. जनतेची सेवा करताना आपण काय बोलतोय,काय करतोय ही सर्व गोष्ट जनता पाहत असते, त्यामुळे काळजी घेतलीच पाहिजे अशा सूचना त्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत.
