डॉ.मणिभाई देसाई पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र कांचन तर उपाध्यक्षपदी रामदास चौधरी यांची बिनविरोध निवड…!

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील डॉ. मणिभाई देसाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र ज्ञानोबा कांचन व उपाध्यक्षपदी रामदास पंढरीनाथ चौधरी यांची फेर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून संस्थेचे संस्थापक / अध्यक्ष राजेंद्र कांचन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मणिभाई देसाई सहकार पॅनेलने सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवून संस्थेवर एकहाती वर्चस्व कायम ठेवले होते. पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल झाल्यानंतर पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अपेक्षेप्रमाणे संचालक मंडळाने एकमुखी अध्यक्षपदी राजेंद्र ज्ञानोबा कांचन व उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी जाहीर केले.
याप्रसंगी उरुळी कांचन चे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते माऊली कांचन , सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, विठ्ठल बन देवस्थान समिती विश्वस्त एल.बी.कुंजीर, खामगाव टेकचे उपसरपंच विठ्ठल थोरात,पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी,संजय टिळेकर, संजय कांचन , अनिकेत कांचन, खेमचंद पुरुषवानी, शरद वनारसे, जीवन शिंदे, धनंजय पोंदकुले,सारीका काळभोर, कमल कांचन ,उरुळी कांचन ग्रा.प. सदस्य सुनिल तांबे, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, व्यवस्थापक ह्षीकेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेची २९ वर्षानंतर प्रथमच संचालक मंडळाची निवडणूक लागली होती. १९९१ मध्ये स्थापीत या संस्थेवर अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी अध्यक्षपद भूषविले आहे. संस्थेचे राज्यपातळीवर कार्यक्षेत्र असून पुणे जिल्ह्यात ८ शाखांत संस्थेचा विस्तार आहे. सतत ‘अ ‘वर्ग ऑडीट कायम ठेऊन संस्थेकडे २४० कोटींच्या ठेवी आहेत. संस्थेला अनेक राज्यपातळीवर पुरस्काराने अनेकवेळा गौरविण्यात आले आहे. तर अनेक सहकार क्षेत्रातील मान्यवर पतसंस्थेला भेटी देऊन कारभाराची माहिती घेत आहेत. संस्थेने रौप्यमहोत्सवी वाटचालीनंतर ग्रामीण भागात अर्थिक जाळे उभे केले आहे.