लोणी काळभोर येथे गॅस गळतीमुळे मोठा स्फोट! गंभीर झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू…

लोणी काळभोर : सोमवार (ता.१) रोजी येथील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये घरांतील महिला भाजून गंभीर जखमी झाली होती. तिचा शनिवार (६ डिसेंबर) रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे.

या घटनेमध्ये करूणा मनोज जगताप (वय रा. जगताप साईट्स, नेहरू चौक, लोणी काळभोर) या मृत्यूमुखी पडल्या आहेत. करुणा जगताप या जगताप हाईट्स मध्ये पहिल्या मजल्यावर आपले पती व दोन मुलांसह रहातात. १ डिसेंबर रोजी सकाळी त्यांचे पती कामाला तर मुलें शाळेत गेल्याने त्या घरात एकट्या होत्या. घरात गॅसच्या दोन टाक्या व गॅस गिझर आहे. सोमवारी सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला.

यामुळे दिवाळीला आणलेले फटाके घरात शिल्लक राहिले होते. ते ही यावेळी जोरात वाजले. या स्फोटात करुणा जगताप या होरपळल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की, घराचे दरवाजे, खिडक्या तुटून पडल्या. घरात व समोरच्या रस्त्यावर काचांचा खच पडला. घरातील वस्तू जळून खाक झाल्या. याचवेळी नेहरू चौकाजवळील रस्त्यावरून तिघेजण दुचाकीवरून चालले होते. या स्फोटाने एक खिडकी तूटून दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाच्या हातावर पडल्याने त्याच्या हाताचे हाड मोडले आहे.

पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
करूणा जगताप या स्फोटात भाजल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला आहे. सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या करुणा जगताप यांचा मृत्यू झालेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
