बनावट औषध निर्मिती प्रकरणी शिक्रापूरमधील फार्मा कंपनीवर मोठी कारवाई! ५५ लाखांचा साठा केला जप्त…

शिरूर : शिक्रापूर येथील प्रतिमा फार्मास्युटिकल्स या औषध निर्मिती कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ५५ लाख ६२ हजार रुपयांचा औषधसाठा व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट औषधांचा सध्या सुळसुळाट सुरू आहे. यामुळे बनावट औषधांची निर्मिती व विक्री केल्याप्रकरणी कंपनीचे मालक आणि अन्य तिघांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. मार्चमध्ये वानवडी येथील एका रुग्णालयातून घेतलेल्या औषध नमुन्यांच्या तपासणीत औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

यामुळे पथकाने शिक्रापूर येथील प्रतिमा फार्मास्युटिकल्स येथे छापा टाकून केलेल्या तपासणीत कंपनीकडे औषध निर्मितीसाठी आवश्यक परवाने नसल्याचे उघड झाले. यामध्ये सहाय्यक आयुक्त स.भा. दातीर, औषध निरीक्षक श्रुतिका जाधव व वि. वि.पाटील यांनी कारवाई केली.

विनापरवाना औषध निर्मिती करत असलेली प्रतिमा फार्मास्युटिकल्स ही कंपनी तब्बल एकवीस औषधांचे उत्पादन करत होती. या औषधांचा साठा अनेक ठिकाणी विक्री करण्यासाठी जात होता. याबाबत अनेक पुरावे देखील त्यांच्याकडे नसल्याचे पुढे आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतिक जगताप हे करत आहेत. या प्रकरणी औषध निरीक्षक मनोज नंदकुमार अय्या यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
