महाविकास आघाडीचा गेम ओव्हर! मुंबईतील ‘शिवालय’ बैठकीला शरद पवार गटाची दांडी, चर्चाना उधाण..

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अधिक जोर आला होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांने अजित पवार गटाशी हात मिळवणी केली तर महाविकास आघाडीच काय होणार या चर्चा रंगल्या होत्या.आता आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज मुंबईतील ‘शिवालय’ येथे पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दांडी मारली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दांडी मारली.राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित राहिल्याने मविआ राज्यात संपुष्टात आली आहे का?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्यातील महायुती सरकारचा विधीमंडळात एकत्रितपणे विरोध कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित होती. मागील काही काळातील घटनांमुळे महायुतीवर पलटवार करण्याची संधी विरोधकांच्या हाती आहे. जनतेच्या विविध मुद्यांवरही सरकारला घेरण्याची रणनीती आखली जाणार होती. मात्र, राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनासाठीच्या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादी गैरहजर राहणार असतील, तर आगामी काळात मविआ सरकारविरोधात कशा प्रकारे लढा देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.