महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी! १९व्या वर्षी ग्रँडमास्टर बनलेली दिव्या होणार मालामाल, किती रुपयांचं मिळणार बक्षीस?

मुंबई : महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या आणि नागपूरच्या मातीने घडवलेल्या एका मराठमोळ्या मुलीने जागतिक बुद्धिबळ पटलावर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. अवघ्या १९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने FIDE महिला विश्व बुद्धिबळ कप २०२५ चे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे.

जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.

सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दिव्याने कोणतीही चूक न करता हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेला. टायब्रेकरमध्ये काळ्या मोहरांवर खेळताना दिव्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत निर्णायक विजय मिळवला.

सामन्यात एक क्षण असा आला होता, जिथे हम्पीकडे पुन्हा सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र, ती त्या संधीचं रूपांतर विजयात करू शकली नाही. दुसरीकडे, दिव्याने कोणताही चुक न करता ऐतिहासिक कामगिरी केली आणि महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला.
जर अंतिम फेरीतील सामन्यात दोन्ही खेळाडूंचा स्कोअर बरोबरीत राहिला, तर निकाल लागण्यासाठी टायब्रेकर राउंड खेळवले जातात. या टायब्रेकरमध्ये प्रत्येक खेळाडूला १५-१५ मिनिटे दिली जातात आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंद वाढवले जातात, जर स्कोअर अजूनही बरोबरीत राहिला असता, तर पुन्हा एकदा १०-१० मिनिटांचे आणखी एक सेट खेळवले गेले असते, त्यातही प्रत्येक चालीनंतर १० सेकंद मिळाले असते. पण या सगळ्याची गरजच पडली नाही, कारण दिव्याने पहिल्याच टायब्रेकरमध्ये हम्पीला मात दिली आणि थेट विजेतेपदावर कब्जा केला.
दरम्यान, या शानदार विजयासह, दिव्या देशमुख भारताची 88 वी ग्रँडमास्टर देखील बनली आहे. बुद्धिबळाच्या जगात ग्रँडमास्टर ही पदवी सर्वात प्रतिष्ठित मानली जाते आणि ती मिळवणं ही कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी आहे. या विजयानंतर दिव्याला बक्षीस म्हणून सुमारे 43 लाख रुपये मिळतील. तर हम्पीला सुमारे 30 लाख रुपये मिळतील.
