तिहेरी अपघाताने महाराष्ट्र हादरला!! बुलढण्यात भीषण घटना, 5 जणांचा मृत्यू, 24 जखमी…

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २४ जण जखमी आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अपघातातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पहाटे अपघात झाल्यानंतर जोरदार आवाज झाला, त्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर जखमींना मदतकार्य करण्यात आले. नंतर पोलिस आणि आपत्कालीन सेवांना सूचना देण्यात आल्या. जयपुर लांडे फाट्या समोर हा अपघात झाला आहे.

पुणे येथून परतवाडा येथे जाणाऱ्या एसटी बसला आधी चारचाकी वाहनाने मागून धडक दिली, त्यानंतर खाजगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवले. अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. याबाबत पोलीस कुटूंबियांशी संपर्क करत आहेत.

अपघातामधील जखमींना उपचारासाठी खामगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, चिंताजनक अवस्थेत असलेल्या प्रवाशांना उच्चस्तरीय उपचारासाठी बुलढाणा आणि इतर मोठ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मात्र या अपघातामध्ये नेमकं चूक कोणाची होती याबाबत माहिती मिळू शकली नाही.
