Maharashtra Rain Update : राज्यात आजही धो-धो! अनेक ठिकाणी रेड, तर कुठे ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या राज्याची परिस्थिती…
Maharashtra Rain Update : मान्सूनने परतीची वाट धरली आहे. परिणामी गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने झोडपले आहे. पावसाचा जोर मंगळवारी वाढल्यानंतर मुंबईला देण्यात आलेले पावसाचे इशारे सातत्याने अद्ययावत करण्यात आले.
त्यातच बुधवारी संध्याकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने सायं. ५.३० नंतर मुंबईसाठी रेड अलर्ट देण्यात आला. गुरुवारी सकाळी ८.३०पर्यंत हा रेड अलर्ट जारी असून, गुरुवारी दिवसभरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
चेंबूर, मानखुर्द भागांमध्ये पावसाचा जोर सायंकाळी अधिक होता, तर नवी मुंबईमध्ये दुपारी अडीच ते आठ-साडे आठ वाजेपर्यंत पावसाचा जोर अधिक होता. गुरुवारी पहाटे पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली असल्याने गुरुवारसाठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update
मुंबई, ठाणे येथे गुरुवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला असून, पालघर येथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पालघरमध्ये अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे.