Maharashtra Politics : निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वीच महाविकास आघाडीला धक्का, वंचितने घेतला मोठा निर्णय…

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपांसाठी धावपळ सुरू केली आहे. चर्चा, खलबतं करून हा तिढा सोडवला जात आहे.
महाविकास आघाडीचीही आज खलबत होत आहे. पण त्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या जागा आम्ही नाकारत असल्याचं वंचित आघाडीने म्हटलं आहे.
त्यासाठी वंचितने महाविकास आघाडीवर गंभीर आरोपही केला आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अवघा दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्या सर्व हारणाऱ्या जागा होत्या.त्यामुळे या जागांचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत.
वंचितच्या पुण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीने आम्हाला सुधारीत प्रस्ताव द्यावा. आघाडी कायम राहावी म्हणून आम्ही अकोला मतदारसंघही सोडायला तयार झालो होतो. Maharashtra Politics
पण केवळ मतं मिळवण्यासाठी आम्हाला पडणाऱ्या जागा सोडण्यात येत होत्या. ते योग्य नाही, असं सांगतानाच आम्ही आघाडीचा प्रस्ताव फेटाळत आहोत. आम्हाला चर्चेत सहभागी करून घेतलं जात नाही, असा आरोपही मोकळे यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झाले आहे.