महाराष्ट्र केसरी (महिला) कुस्ती स्पर्धा जिकंत वाडे बोल्हाईतील सुवर्णकन्या साक्षी कास्य पदकाची मानकरी…!


उरुळी कांचन : महाराष्ट्र केसरी हे नाव जरी ऐकले तरी डोळ्या समोर उभी राहते ती हजारोंची गर्दी,कुस्ती क्षेत्राचा कुंभमेळा,या स्पर्धेची दरवर्षी कुस्ती शौकीन चातकाप्रमाणे वाट बघत असतात.

प्रतिवर्षी महाराष्ट्र केसरी किताब हा पुरुष मल्लांना दिला जातो परंतु यंदापासून हा किताब महिलांनाही दिला जाणार आहे. याच अनुषंगाने सांगली येथे नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र केसरी (महिला) कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजन गटात वाडे बोल्हाई (ता. हवेली, जि. पुणे) येथील सुवर्णकन्या साक्षी गुलाबी इंगळे हिने प्रेक्षणीय कुस्त्या करून कास्य पदक पटकाविले आहे.

महाराष्ट्र केसरी (महिला) कुस्ती स्पर्धेत साक्षीने केलेल्या या कामगिरीचे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वच स्तरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत २३ मार्च ते २४ मार्च २०२३ रोजी पार पडली. या स्पर्धेत साक्षीने उल्लेखनीय कामगिरी करून पुणे जिल्ह्याला कांस्यपदक मिळवून देण्याचा विक्रम केला आहे.

कुस्तीचा कसलाही वारसा नसताना साक्षीचे आई-वडील तिच्या पाठीशी उभे राहिले आहेत. नेहमी तिला प्रोत्साहन देत आहेत. कुस्ती क्षेत्रातील धडे शिकावेत म्हणून त्यांनी साक्षीला श्रीगोंदा येथील इंटरनॅशनल कुस्ती संकुलात सरावासाठी पाठविले आहे. सध्या साक्षी उत्तम प्रकारे कुस्तीचे धडे शिकत आहेत.

साक्षीने यावर्षी मिनी आलिंपिक, खाशबा जाधव, शिवराय केसरी, मंगळवेढा केसरी अशा अनेक स्पर्धेत भाग घेऊन मेडल मिळविले आहेत. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे नातेवाईक, गावातील कार्यकर्ते यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

साक्षीला या यशासाठी महाराजा कॉलेजचे प्रा. संजय डफळसर, तालमीचे समाधान सर, मेजर हनुमंत फंड यांचे मार्गदर्शन मिळाले. तर साक्षीला तिचे काका सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप इंगळे , कालिदास इंगळे, वाडेबोल्हाईचे माजी उपसरपंच विद्याधर बापु गावडे, पंचायत समिती सदस्य श्याम गावडे, माजी उपसरपंच संजय भोरडे, माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, बळीआबा गावडे, संजय पायगुडे, संतोष चव्हाण, नीळकंठ केसवड, महेश शिंदे, प्रकाश इंगळे, दर्शन चौधरी, युवराज इंगळे, प्रमोद गावडे , बापूसाहेब भोर, भाऊसाहेब वारघडे, अशोक इंगळे या सर्वांचे सहकार्य मिळाले.

दरम्यान, सांगली येथे पार पडलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत सांगलीची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात झाली. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. तेव्हा मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता सर्वांमध्ये होती. अखेर या लढतीत प्रतीक्षा बागडी हिने वैष्णवी पाटीलला चितपट करून ही स्पर्धा जिंकली. आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान प्रतीक्षा बागडी यांनी मिळवला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!