Maharashtra Kesari : ‘लोणीकंद’ला रंगणार ‘महाराष्ट्र केसरी २०२३-२४’ची किताबी स्पर्धा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राहणार उपस्थिती! प्रदिप कंद व संदिप भोंडवे करणार स्पर्धेचे संयोजन..!
Maharashtra Kesari उरुळीकांचन : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे.यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी माहिती ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष व खासदार रामदास तडस यांनी दिली आहे.
“महाराष्ट्र केसरी २०२३-२४ ची स्पर्धा प्रथमच नगर रोडवर होत आहे. या स्पर्धेचे नियोजन अतिशय देखण्या स्वरुपात करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आमंत्रण देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी उपस्थिती लावणार असल्याचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितले आहे.
लोणीकंद येथे २००९-१० मध्ये हिंदकेसरी स्पर्धा घेतली होती. “सलग सहा दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार असून, राज्यभरातील मल्ल एकमेकांशी दोन हात करणार आहेत. ३५ जिल्ह्यातील आणि ११ महापालिकामधील ४६ जिल्हा तालीम संघातील ९०० ते ९२५ मल्ल या स्पर्धेत सहभागी होत आहेत. यासह महाराष्ट्र केसरी वजनगटामध्ये नामांकित ४० मल्लही सहभागी होणार आहेत. अतिशय रंजक अशा लढती पाहण्याची संधी आहे. आपल्या मल्लांनाही या स्पर्धेचा निश्चित फायदा होणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे,” असे प्रदिप कंद व पै. संदीप भोंडवे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे करणार असून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सोमवारी (ता.२५) स्पर्धा संयोजनाचा आढावा घेतला.
यावेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, आशियाई सुवर्णपदक विजेता पै रविंद्र पाटील , महाराष्ट्र केसरी पै.बाप्पुसाहेब लोखंडे , पै. सईद चाऊस पै.अस्लम काझी तसेच पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह पदाधिकारी, कुस्तीगीर उपस्थित होते.