‘महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत,हीच विजयादशमीची विजय गर्जना ; दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरेंची गर्जना…

पुणे : दरवर्षी यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा खास ठरणार आहे. या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलं असताना आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विजयादशमीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल’ अशी गर्जना करण्यात आली आहे.

यंदाही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षावर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली आहे. देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान आणि जनतेचा आवाज बंदिवान होऊ नये, यासाठी संकल्प करणे हाच खरा विजयादशमीचा विजयोत्सव असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. आज विजयादशमीचा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत. मोदी राज्यात फक्त उत्सवच सुरू असतात. राजा उत्सवात मग्न असतो आणि प्रजा मात्र तळमळत असते. त्यामुळे आजचा दसऱ्याचा उत्सव तरी वेगळा आहे काय? असा टोला लगावला आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, पहलगाम हल्ल्यातील बळींचे कुटुंबीय, लडाखमधील सोनम वांगचुक यांचा प्रश्न, मणिपूरमधील अशांतता आणि बिहारमधील मतचोरी यांसारख्या गंभीर प्रश्नांवरुन सामनातून सरकारला धारेवर धरण्यात आले आहे. आता दसरा मेळावातून उद्धव ठाकरे कोणावर तोफ डागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
