Maharashtra : शिंदे गटाकडून महिलांना बुरखा वाटप, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..

Maharashtra : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत.
त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे. Maharashtra
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याचे आता दिसत आहे. या संदर्भातील एक बॅनर भायखळा येथे लावण्यात आले होते. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणा-या शिंदेसेनेला अचानक मुस्लिमांची आठवण कशी झाली? असा सवालही विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता या बुरखा वाटपावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
भायखळा येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर या मतदारसंघात प्रथमच मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात येणार असल्याचे लिहिले आहे. आमदार यामिनी जाधव यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहे. तर यावर धर्माच्या आधारे संधिसाधू राजकारण करत असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत.