Maharashtra Cabinet Meeting : लग्न करणाऱ्या जोडप्यांची होणार दिवाळी! मिळणार ‘इतके’ पैसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय…
Maharashtra Cabinet Meeting : शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता २५ हजार रुपये अनुदान मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला व बालविकास खात्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून २५ हजार रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहांसाठी मंगळसूत्र आणि इतर वस्तुंच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला १० हजार रुपये अनुदान देण्यात येते.
त्याचप्रमाणे सामूहिक विवाह राबविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना २ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येतं. आता जोडप्यांना २५ हजार रुपये आणि संस्थांना २५०० रुपये वाढीव अनुदान देण्यात येईल. हे अनुदान डीबीटी पद्धतीने थेट खात्यात जमा होईल. Maharashtra Cabinet Meeting
दरम्यान, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय, बहुजन कल्याण आणि इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदानातही आजच्या या महिला व बालविकासच्या निर्णयानुसार वाढ करण्यात येईल. यासाठी संबंधित विभागांनी तसे प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.