Maharashtra Assembly Election 2024 : ८५ जागांची खात्री, पण २५ जागांची चिंता, भाजपने आखली विधानसभेची ‘अशी’ रणनीती…
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होणार आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत.
लोकसभेला फटका बसल्यानंतर आता विधानसभेसाठी रणनीती आखत भाजपने तयारी सुरु केलेली आहे. लोकसभेला भाजपाला मतदारांनी नाकारले. तेच चित्र विधानसभेला दिसू नये म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने याची दखल घेत राज्यात राजकीय वातावरणाचा आणि जनतेचा कौल लक्षात घेण्यासाठी परराज्यातील नेते महाराष्ट्रात पाठवले आहेत.
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवण्यासाठी त्याची मदत होणार आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रात विशेष जबाबदारी देण्यात आलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामधील बड्या नेत्यांची चार तासांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी सर्व नेत्यांना पुढील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा भाजपने काढल्या असून त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्यावेळी जिंकलेल्यांपैकी २५ जागांवर यावेळी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचा सूर पक्षाच्या बैठकांमध्ये व्यक्त होत आहे.