बीडमधून मोठी बातमी! धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच महादेव मुंडेंची हत्या?, नार्को टेस्टचा हवाला देत ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा…


बीड : बीड जिल्ह्यातील परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्येला दोन वर्षे चार महिने उलटूनही अद्याप मुख्य सूत्रधार मोकाट असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी गुरुवारी (ता.५ मार्च) पत्रकार परिषदेत स्फोटक दावा केला आहे.

महादेव मुंडेंची हत्या तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाली, असा थेट आरोप राजाभाऊ फड यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

त्यांच्या मते या प्रकरणातील आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यात आली असून त्या तपास प्रक्रियेत आमदार धनंजय मुंडे यांचे नाव समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली, असे फड यांनी म्हटले. या दाव्यामुळे बीडसह संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडे असून आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. मात्र तपासावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही फड यांनी केला. त्यामुळे तपास निष्पक्षपणे होण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.

तसेच या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून धनंजय मुंडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 120B अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. जर वेळेत कारवाई झाली असती, तर पुढे काही अन्य गंभीर घटना घडल्या नसत्या, असेही त्यांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात लवकरात लवकर सत्य समोर यावे, अशी मागणी करत फड यांनी प्रशासनाला २० मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर त्या कालावधीत मुख्य आरोपींवर कारवाई झाली नाही, तर मृताच्या कुटुंबीयांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!