पुण्यात ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे गरजू रुग्णांवर होणार उपचार…


पुणे : जिल्ह्यातील गरजू रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करण्यासाठी आणि त्यांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मैदानावर ६ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाआरोग्य शिबिराच्या आयोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिराचे समन्वयक रामेश्वर नाईक, मनपा उपायुक्त महेश पाटील, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदी उपस्थित होते.

कदम म्हणाल्या, रुग्णसेवेसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता व पाण्याची सुविधा करण्यात यावी. लोकसहभागातून शिबिराचे आयोजन होत असल्याने सर्व यंत्रणांनी आयोजनात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नाईक यांनी महाआरोग्य शिबिराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून लोकसहभागाद्वारे अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरात निदान झालेल्या गंभीर आजारावर जागतिक किर्तीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या शिबिरात औषधाची गरज असणाऱ्यांना ती मोफत देण्यात येतील. गरजू रुग्णांना वैद्यकीय साधने आणि सुविधा देण्यात येतील आणि आवश्यक असल्यास विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० तज्ज्ञ डॉक्टर आणि विविध संस्थांशी सहकार्याबाबत चर्चा केली आहे. या सर्वांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. हे सेवाकार्य असल्याने सर्व विभागांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

महाआरोग्य शिबिरासाठी २२ जुलै पासून आत्तापर्यंत सुमारे ५८ हजार नागरिकांची पूर्व आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात रक्त, लघवी तपासणी व एक्सरे आदी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता शिबिराचे उदघाटन करण्यात येणार आहे.

महाआरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश असणार आहे. डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच. संचेती, डॉ.विकास महात्मे, डॉ.यशराज पाटील, डॉ.ललवाणी, डॉ.चंदनवाले, डॉ.तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया असे तज्ज्ञ डॉक्टर्स शिबिरास उपस्थित राहणार आहेत.

शिबिरात एकूण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश असणार आहे. बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान, नाक, घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मूत्ररोग, प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुवंशिक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृद्धांची सामान्य तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुने संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी करण्यात येईल.

गरजू रुग्णांना कृत्रिम अवयव, चष्मे, वृद्ध काठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळ्या यांचे नोंदणीनुसार वाटप करण्यात येईल. सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नास्ता व भोजनाची सोय करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!