शेतकऱ्यांसाठी महाएल्गार ; बच्चू कडू फडणवीसांच्या भेटीला मुबंईत ; तोडगा निघणार की आंदोलनाची धार वाढणार?

नागपूर: प्रहार संघटनचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ धडकल्यामुळे शहरातील महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता आज सायंकाळी सात वाजता बच्चू कडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. यासाठी बच्चू कडू मुंबईला रवाना होणार आहेत. या आंदोलनाच्या संपूर्ण कर्जमाफीसह 22 प्रमुख मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना चर्चेसाठी मुंबईत बोलावले असून आज बच्चू कडू हे या चर्चेसाठी मुंबईत येणार आहे. काही वेळातच ते नागपूरहून मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुमारे दहा हजाराहून आंदोलक सहभागी झाले आहेत.त्यांच्या ‘महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा’मुळे नागपूर-हैदराबाद व नागपूर-जबलपूर महामार्गांवरील वाहतूक बुधवारी सायंकाळपासून पूर्णपणे थांबली होती. नागरिकांना शहरात येण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला. या आंदोलनामुळे नागपूरकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आंदोलक स्वतःला अटक करून घेण्यासाठी पुढे सरसावल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आंदोलनावर तोडगा निघणार की आंदोलनाची धार आणखीन वाढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची आणि चर्चेतून मार्ग काढण्याची विनंती केली. या चर्चेत राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, वामनराव चटप, खा. अमर काळे, महादेव जानकर, रवी तुपकर यांसारखे शेतकरी नेते सहभागी झाले होते. आंदोलकांना भीती होती की चर्चेसाठी गेल्यास त्यांचं आंदोलन दडपलं जाईल. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणावी, अशी मागणी केली आहे.

