Madhya Pradesh : मोठी बातमी! उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, पुजाऱ्यासह १३ जण….
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात मोठी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या मंदिरात सकाळी मोठा अपघात झाला. मंदिराच्या गर्भगृहात होळीच्या दिवशी भस्म आरती सुरू असताना अचानक आग लागली आणि यामध्ये १३ जण होरपळले. जखमींमध्ये पुजारी आणि मंदिरातील सेवकांचाही समावेश आहे.
सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महाकाल मंदिरातील भस्मर्तीचे मुख्य पुजारी संजय गुरु, विकास पुजारी, मनोज पुजारी, अंश पुरोहित, सेवक महेश शर्मा आणि चिंतामण गेहलोत यांच्यासह अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितले की, भस्म आरतीच्या वेळीही गुलाल वापरला जातो. भस्म आरतीदरम्यान आज गर्भगृहात कापूर जाळण्यात आला, त्यामुळे आत उपस्थित असलेले १३ जण होरपळले आहेत. Madhya Pradesh
या लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोणत्याही खोल जखमा नाहीत, सर्व स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मंदिरात दर्शन सुरळीत सुरू आहे. मंदिरात कोणत्याही प्रकारची अडचण नाही.
त्यावेळी जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती होती. सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते. मागून आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल ओतल्याचे जखमी सेवकाने सांगितले.
गुलाल दिव्यावर पडला. गुलालात केमिकल असल्याने आग लागली असावी. दुसरीकडे, गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंग आणि गुलालापासून संरक्षण करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. यामध्येही आग पसरली आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे.