ई-केवायसी करताना चूक झालीय, लाडक्या बहीण योजनेचा हप्ता थांबलाय? घाबरू नका! अशाप्रकारे ई-केवायसी दुरुस्त करा आणि पुन्हा लाभ मिळवा…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

तसेच लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका असल्यामुळे हजारो महिलांचे दीड हजार रुपयांचे मासिक हफ्ते बंद झाले होते. यामुळे अनेक लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली होती.


आता यावर दिलासा देणारी माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली असून, ई-केवायसीतील चूक दुरुस्त करून लाभ पुन्हा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री महोदयांच्या लाडकी बहीण योजनेत काही लाभार्थी महिलांचे पैसे ई-केवायसीमधील चुकीमुळे प्रलंबित राहिले होते.
या संदर्भात तातडीने बैठक घेऊन अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांच्या माध्यमातून पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांचा हफ्ता थांबला होता, त्यांना लवकरच पुन्हा पैसे मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींनी आपल्या गावातील किंवा शहरातील अंगणवाडी सेविकांजवळ आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि संपर्क क्रमांक जमा करावा. त्यानंतर अंगणवाडी सेविकांकडून माहितीची पडताळणी केली जाईल. क्रॉस व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी महिलांचा हफ्ता पुन्हा सुरू करण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
